नांदेड / नायगांव – तालुक्यातील खतगांव या छोट्याशा पण गुणी गावांचे नाव राज्यभर झळकवणारी आनंदवार्ता! इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या देशातील प्रतिष्ठित संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सप्टेंबर २०२५ च्या चार्टर्ड अकाउंटंट ‘सी.ए’ परीक्षेत खतगांव येथील अधिराज अनंत पाटील.खतगांवकरने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या परीक्षेत एकूण ५१,९५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी १२,८११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये अधिराज यांचे नाव तेजाने झळकले आहे. या यशामुळे खतगांवसह शंकरनगर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अधिराज हे कै. मधुकररावजी पाटील खतगांवकर यांचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांचे नातू तसेच डॉ. अनंत पाटील खतगांवकर यांचे सुपुत्र आहेत. कुटुंबातील शैक्षणिक परंपरेचा वारसा जपत, मेहनत, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर अधिराज यांनी हे यश मिळवले आहे.
या यशाबद्दल गोदावरी मनार पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शंकरनगर चे प्राचार्य आदरणीय डी. पी. पांडेय सर यांनी अधिराज यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “अधिराज यांचे हे यश आमच्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे.त्यांनी दाखवलेल्या मेहनतीचा आदर्श इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे पब्लिक स्कूल चे प्राचार्य डी.पी.पाडेंयसर यांनी म्हटले आहे.
अधिराज यांच्या या यशामुळे खतगांवासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण आहे. नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार यांच्याकडून अधिराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अधिराज ने या यशाचे श्रेय आपल्या पालकांच्या प्रेरणेला, व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि स्वतःच्या अथक परिश्रमांना दिले आहे. खतगांवचा हा तरुण अधिराज आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणून उज्ज्वल कारकीर्दीस प्रारंभ करीत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

















