बार्शी – कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीत पुन्हा एकदा सोपल-राऊत यांच्यातच चुरशीचा सामना रंगणार असल्याने, या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही गटाकडून १८ जागांसाठी एकूण ११९ अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सोसायटी मतदारसंघातील ११ जागांपैकी ७ जागी सर्वसाधारण पुरुष, २ जागी सर्वसाधारण महिला, इतर मागासवर्गीय जागा १ व भटक्या विमुक्त जमातीची १ जागा आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागांपैकी २ जागा सर्वसाधारण, १ जागा अनुसूचित जाती जमाती व १ जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी आहे. व्यापारी व अडते मतदार संघातून २ जागा व हमाल-तोलार मतदारसंघातून १ जागेसाठी अर्ज दाखल झालेले आहेत.
यामध्ये सोपल गटाकडून पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मकरंद निंबाळकर, माजी संचालक अरुण येळे, नंदकुमार काशीद, भास्कर काशीद, सुभाष शेळके, अशोक काशीद, माजी नगरसेवक अंबादास शिंदे, राजाभाऊ चव्हाण, किरण काकडे या प्रमुख नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष निंबाळकर, मदन दराडे, संजीव बगाडे, विजय गरड, प्रभाकर डमरे, अजित बारंगुळे, अभिजीत कापसे, बाबा गायकवाड, बाबा काटे, दशरथ टेकाळे, बाळराजे घाटे या प्रमुख नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा धक्कादायक आणि आश्चर्यकारक निर्णय
या निवडणुकीत माजी आमदार राऊत यांनी त्यांचे सुपुत्र व बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. या निवडणुकीत राऊत यांनी आपल्या मुलाची उमेदवारी नाकारण्याच्या निर्णयामुळे त्यांनी विरोधकांना गोंधळून टाकले आहे. यामागे त्यांची कोणती रणनीती असू शकते, हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.
















