ईस्लापूर / नांदेड – ईस्लापूर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेतील एका खोलीत ठेवलेले विद्यार्थ्यांचे बसण्याचे डेस्क-बेंच लागलेल्या आगीत जळून खाक झाले. ही घटना रविवार दि.9 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नंतर अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ईस्लापूर येथील ही जिल्हा परिषद शाळा जुनी व जीर्ण अवस्थेत आहे.
काही खोल्या वापरण्यायोग्य असल्या तरी बहुतांश इमारतीची पडझड झाली आहे. संबंधित खोलीत विद्यार्थ्यांचे डेस्क ठेवण्यात आले होते. नवीन शाळा दुसऱ्या ठिकाणी सुरू आहे. या शाळेला आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, गावातील नागरिकांनी वेळेवर धाव घेत आग आटोक्यात आणली.



























