अक्कलकोट – अक्कलकोट शहरा लगत असणाऱ्या समर्थ नगर ग्रामपंचायतच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून मध्यरात्री चोरटे हे फिरत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी समर्थ नगर मधील नागरिकांतून केली जात आहे.
समर्थ नगर ग्रामपंचायतच्या हद्दीत दिनांक ६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास तीन चार चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले आहे. सदरील चोरटे हे मध्यरात्री दीड वाजण्याचा सुमारास समर्थ नगर मधील बंगल्यांच्या कंपाउंड मधून उडी मारून घरांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. या चोरट्यांच्या हातामध्ये कोयता असल्याचे दिसून आले आहे.
सध्या कडक थंडीचे दिवस असून नागरिक हे थंडीत घराबाहेर पडत नसल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. थंडीमुळे नागरिक हे लवकर झोपी जात असून चोरटे हे पाळत ठेवून रात्री फिरत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. या प्रकारामुळे समर्थ नगर मधील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने समर्थ नगर भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.
समर्थ नगर मधील चोरट्यांना पोलीस प्रशासनाने पकडण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. समर्थ नगर भागात मागील काही दिवसात दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्या आहेत .यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज , रोख रक्कम चोरट्याने चोरून नेले आहेत. अद्याप पर्यंत या चोरट्यांचा शोध पोलीस प्रशासनाकडून लागला नाही. यामुळे नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे.
समर्थ नगर व अक्कलकोट शहरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी अक्कलकोट शहर व समर्थ नगर मधील नागरिकांतून केली जात आहे.
















