पंढरपूर – वाळु चोरी हा चंद्रभागा नदीला लागलेला कँन्सर आहे असे पूर्वी म्हटले जायचे. कारण पूर्वी गाढवावरुन थोड्याफार प्रमाणात वाळू चोरी होत होती. मात्र आता अक्षरश: मशिन किंवा यंत्रांच्या सहाय्याने चक्क बोटीव्दारे वाळु चोरी केली जाते आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्राकडे आणि तिच्या सभोवतालच्या वाळवंटाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर हा कँन्सर नसून चक्क चंद्रभागेला आलेला हार्टअँटक असल्याचे आता भासु लागले आहे. इतकी भिषण परिस्थिती या बेसुमार अवैध वाळू चोरीमुळे आज चंद्रभागेची झालेली दिसत आहे. तरी देखील महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून वाळू चोरी रोखण्यासाठी कोणताही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसत आहे.
———————–
चौकट : ( विष्णूपद बंधाऱ्या पासून खुलेआम वाळुचोरी )
येथील चंद्रभागा नदीचे सर्वात जास्त प्रदूषण होते आहे ते बेसुमार अवैध वाळु चोरीमुळे. पूर्वी गाढवाव्दारे होणारी वाळु चोरी आता चक्क यांत्रिकी बोटींच्या सहाय्याने होऊ लागली आहे. त्यामुळे पात्रातून उपसलेली वाळू नदीच्या जवळ असलेल्या शेतातील आडोश्याला एखाद्या पर्वता प्रमाणे ढिगाऱ्या सारखी लावण्यात वाळु माफिया मशगुल आहेत. विष्णूपद बंधाऱ्या पासून सध्या देखील रात्रीच्या वेळी गाढवावरुन बेसुमार वाळू उपसा खुलेआम केला जात आहे.
——————–
चौकट : ( अर्थपुर्ण मैत्रीमुळे काम करणाऱ्याचे काहीच चालत नाही )
चंद्रभागेच्या पात्रातून उपसा केलेली वाळू अव्वाच्या सव्वा किंमतीने शेकडो टिपर आणि टँक्टरव्दारे विक्री करुन हेच वाळुमाफिया मालामाल बनत आहेत. तर दुसरीकडे वाळूमाफियांशी असलेल्या महसूल प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण मैत्रींमुळे खरोखर प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे कायद्याने दिलेले अधिकार असताना देखील हातावर हात ठेवुन नुसते बघण्या पलिकडे काहीही करु शकत नाहीत आणि हीच तरी खरी या प्रशासनाची शोकांतिका आहे.
————————–
चौकट : ( अनेक भाविकांना गमवावे लागले आपले जीव )
नदीला पाणी नसताना अथवा कमी असताना होणाऱ्या बेसुमार वाळु उपश्यामुळे पात्रात ऐवढाले मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. या खड्यांचा धोका म्हणजे ज्या वेळी धरणातून नदी मध्ये पाणी सोडल्या नंतर भाविकांना पाण्यामुळे पात्रातील या खड्यांचा अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे पवित्र स्नानाची पर्वणी लुटत असताना अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागल्याच्या घटना घडत आहेत. मात्र तरी देखील तहसील प्रशासनाकडून वाळु चोरीला पायबंद बसावा म्हणून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही.
————————
चौकट : ( वाळवंटातील वाळूची जागा घेतली चक्क मातीने )
चंद्रभागेच्या वाळवंटात काही वर्षापूर्वी ऐवढी वाळू होती की वाळवंटातून चालणे देखील सर्वसामान्यांना जिकरीचे होत होते. मात्र आजची परिस्थिती पाहिली तर वाळवंट हे नावालाच दिसु लागले आहे. कारण या वाळवंटातील वाळुचा ऐवढा बेसुमार उपसा चोरट्यांनी केला आहे की त्यामुळे आज वाळुचे असित्व दिसेनासे होवून आता फक्त इथे वाळुच्या थरा खालची मातीच दिसु लागली आहे.
————————-
चौकट : ( कधीतरी फार्स म्हणून केली जाते कारवाई )
पंढरपूर तालुक्यात नदीकाठावरील विविध गावांतून वाळु माफिया चक्क यांत्रिकी बोटींच्या सहाय्याने वाळुचा प्रचंड उपसा करीत आहेत. प्रशासनाकडून फार्स म्हणून अवचित कधीतरी अशा वाळुचोरीवर किंवा वाळुसाठ्यांवर कारवाईचा बडगा उगरला जातो. या कारवाई मध्ये दोन,चार ( वाळु उपसा करुन पूर्वीच मोडकळीस आलेल्या ) यांत्रिकी बोटी जाळण्यात आल्याचे भासविण्यात येत असते.
—————————-
चौकट : ( शेकडो गाढवाव्दारे होते आहे वाळु चोरी )
तालुक्यात वाळु माफियांकडून जसा वाळु चोरीचा प्रकार अगदी राजरोस बिनदिक्कतपणे सुरु आहे. तशाच प्रकारे शहरात गाढवा वरुन वाळु चोरी मोठ्या प्रमाणावर केली जाते आहे. अगदी कोप बंधारा ते विष्णूपद मंदिर या महत्वाच्या भागात विशेषत्वाने गाढवावरुन वाळू चोरीचे प्रमाण जास्त दिसून येते. ही चोरी करताना शेकडो गाढवांचा उपयोग केला जातो आहे. अगदी पिढ्यानपिढ्या पासून गाढवावरुन खुलेआम दिवसाढवळ्या अशी वाळु चोरी करणारी बरीच कुटुंबे आजही इथे दिसत आहेत.
——————
चौकट : ( या ठिकाणाहून होतेय वाळु चोरी )
शहरातील विष्णूपद बंधारा, स्मशानभूमी शेजारील घाट, जुना अकलूज रस्ता, नवीन (अहिल्या) पुलाच्या परिसरातून, पाणी उपसा केंद्राच्या परिसरातून, चंद्रभागेच्या विविध घाटांवरुन, चंद्रभागा नदीचा बंधारा परिसर, रेल्वेपूल (ब्रीज) परिसरातून, पासष्ठ एकरच्या परिसरातून, शेगावदुमाला परिसरातून या बरोबरच तालुक्यातील नदी क्षेत्र ज्या ज्या गावांमधून जात आहे त्या पैकी बऱ्याच गावांमधून खुलेआम वाळू चोरी होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी महसूल कर्मचारी आणि अधिकारी पहात आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















