बार्शी – प्रत्येक मूल वेगळ्या कामासाठी घडविले असून शिक्षकांनी मुलाच्या मनाचे नेमके दार उघडायला हवे. चारित्र्य निर्मिती हेच शिक्षणाचे उद्दिष्ट तर क्षमतांचे प्रकटीकरण हे ध्येय असायला हवं, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. बार्शी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. भगवंत पंढरीनाथ तथा काकासाहेब सुलाखे यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
काकासाहेब सुलाखे यांच्या योगदानासोबतच शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना उद्देशून बोलताना ते पुढे म्हणाले तंत्रज्ञ कितीही विकसित झाले टू जी,फोर जी, सिक्स जी आले तरी गुरुजीशिवाय पर्याय नाही. गुण म्हणजे गुणवत्ता नव्हे. नैराश्यावर मात करण्याची शक्ती विकसित करणे गरजेचे असून मळलेल्या वाटेनं जाण्याची मानसिकता बदलायला हवी. नव्या वाटा शोधणारी मुलंच काहीतरी करु शकतात हे सांगत मला माझ्या याच शाळेने घडविल्याचे गौरवोद्गार ही मिलिंद जोशी यांनी काढले.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी संस्थेची वाटचाल आपल्या मनोगतातून विषद केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव अनंत कवठाळे यांनी संस्थेचे रचनात्मक काम आणि जयंती सोहळ्याचे स्वरुप आपल्या विचारातून मांडले.
यावेळी व्यासपीठावर बार्शी न. पा. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी भारत बावकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय हिंगमिरे, ज्येष्ठ संचालक श्रीपाद मनगोलीकर यांच्यासह संस्थेचे संचालक रा.द. इंगळे, प्रसन्न देशपांडे, सौ. अश्विनी कुलकर्णी, सौ. ज्योती दीक्षित, सुलाखे काँम्प्युटर ट्रेनिंग सेंटररचे प्रमुख सौ.अनया कुलकर्णी, सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे, सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक तुषार महाजन, सुलाखे इंग्लिश मिडीयम प्रि-प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापिका सौ. बेताळे, श्रीमती मंगलाताई सुलाखे शिशूविहारच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कुलकर्णी, मुख्याध्यापक माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते काकासाहेबांच्या पुतळ्याचे पूजन करुन करण्यात आली. सुलाखे इंग्लिश मिडीयममधील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक व उपप्राचार्य रा. द. इंगळे यांनी, सूत्रसंचालन रामचंद्र इकारे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्वच शाखांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
























