अक्कलकोट – शहर तालुक्यात कार्यरत असलेल्या यशवंत शरद प्रतिष्ठान कडून होणारे विकासाचे व माणसं एकत्र आणण्याचे समजपयोगी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मनोगत श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. येथील पत्रकार सन्मान सोहळा व आरोग्य तपासणी आयोजित
उपक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी हे होते. यावेळी मंचावर पत्रकार संघांचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, राष्ट्रवादी चे अध्यक्ष दिलीप सिद्धे, डॉ.आर.व्ही. पाटील, सुभाष गडसिंग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रकाश सुरवसे यांनी प्रास्तविकातुन आरोग्य शिबीर व पत्रकार सन्मान सोहळ्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी पुढे बोलताना इंगळे म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी दिलेले योगदान अमूल्य असे आहे. त्यांच्या विचाराने काम करणाऱ्या या प्रतिष्ठानने पत्रकार दिनानिमित्त केवळ सन्मान न करता आरोग्य तपासणी देखील केली. असेच लोकोपयोगी कार्य करत रहावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष सुरेशचंद्र सूर्यवंशी यांनी लाडक्या बहिणीप्रमाणे लाडके पत्रकार ही योजना सरकारने सुरु करावी असे मत व्यक्त केले. यावेळी अक्कलकोट व शहर तालुक्यातील ३० पत्रकारांचा गौरव करून आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल महेश इंगळे यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुधाकर गोंडाळ, फरीद जमादार, नागनाथ पाटील, माणिक बिराजदार, शुक्राचार्य चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन शंकर व्हनमाने यांनी केले तर रमेश पुजारी यांनी आभार मानले.


















