सांगोला – स्वराज्याच्या संकल्पनेच्या पहिल्या शिल्पकार राजमाता माँसाहेब जिजाऊ व भारताचे महान सुपुत्र, आध्यात्मिक क्रांतीचे जनक स्वामी विवेकानंद यांची जयंती सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे, ता.सांगोला येथे उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले, विश्वस्त विश्वजित इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डी.फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी भारती मोटेनी मनोगतात स्वामी विवेकानंदांनी नेहमीच तरुणांना शक्ती, स्वावलंबन आणि समाजाप्रती जबाबदारीचा संदेश दिला. राजमाता जिजाऊ यांनी बालवयापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात धर्म, स्वराज्य, न्याय आणि जनतेप्रती कर्तव्याची जाणीव रुजवली. म्हणूनच राजमाता जिजाऊ यांचे कार्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरते असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय युवक सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी तसेच पालक, नागरिक व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कॉलेज परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.एस.पी.जोकार, प्रा.ए.व्ही.सपाटे, सांस्कृतिक विभागाचे डॉ.एन.ए.तांबोळी उपस्थित होते.


















