पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी झाली असून महाविद्यालयातील पूजा माने, आकांक्षा रोंगे, तनवी माने व अमृता आगवणे या चार महिला खेळाडूंची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. ही आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धा राजस्थान येथील बनस्तली विद्यापीठात होणार आहे.
या खेळाडूंनी विद्यापीठस्तरीय निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण व संघभावना यामुळेच ही निवड शक्य झाली असल्याचे क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव सर व सर्व उपप्राचार्य विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले तसेच प्रा. मनोज खपाले सर यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राजस्थान येथे होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडू आपल्या विद्यापीठासह महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


















