टेंभुर्णी – स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी महिलांच्या सन्मानाचा दणक्यात संदेश देत टेंभुर्णी पोलिसांनी ‘जंजिरा’ हॉटेल फॅमिली गार्डन अँड लॉजिंगवर धडक मारली. रात्रंदिवस चाललेला देहव्यापाराचा काळोख उघडकीस आणत चार सौदागरांना अटक केली, एक सौदागर फरार; तर तीन पीडित महिलांची सुखरूप सुटका करून त्यांना पुनर्वसनासाठी सोलापूर महिला सुधारगृहात दाखल केले. जिजाऊ मातेच्या शौर्यपूर्ण जयंतीला शोषणाच्या या कृत्याला पूर्णविराम देणारी ही कारवाई सनसनाटी तर आहेच, भावनिकही आहे!
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांना १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोपनीय सूत्राने धक्कादायक माहिती मिळाली. जंजिरा लॉजचे मालक, मॅनेजर आणि कर्मचारी संगनमताने विविध जिल्ह्यांतून व इतर राज्यांतून महिलांना आणून आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करत असल्याचे सांगितले. बातमीची खातरजमा करण्यासाठी पंच आणि डमी ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. रात्री ११.३० वाजता पहिल्या मजल्यावरील रूम नंबर १०३ मध्ये धडक मारताच चार पुरुष आरोपी आणि तीन महिला सापडल्या. चौकशीत हे सौदागर महिलांकडून पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईत चार न वापरलेले कंडोम, डमी ग्राहकाकडून दिलेले १,५०० रुपये रोख आणि १८ ग्रॅम गांजा असा मुद्देमाल जप्त!
महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक १४/२०२६ दाखल. आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६; भारतीय न्याय संहिता २०२३ चे १४३(२),१४३(३),३(५); आणि एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क),२७ लावले. सौदागर हणुमंत क्षिरसागर हा फरार असून लहु उर्फ डॉन क्षिरसागर (दोघे रा. शिडसिंगे, ता. माढा), तुशार अशोक मिसाळ (२२, रा. वाघोली, ता. माळशिरस), राहुल बाबासाहेब जाधव (२९, रा. सातमाने, रावळगाव, ता. मालेगाव, नाशिक).तर गांजा व देह व्यापाऱ्यांचे पैसे घेणारा सौदागर क्षिरसागर याच शोध सुरू असल्याचे पो. नि नारायण पवार यांनी सांगितले.
इतिहासातील शौर्याचे प्रतीक जंजिरा किल्ल्याच्या नावाने चाललेल्या या लॉजमध्ये बेकायदेशीर धंदा चालला होता. जिजाऊ जयंतीला झालेल्या कारवाईने महिलांच्या सन्मानाला नवसंजन दिले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर एसपी प्रीतम यावलकर व करमाळा उपविभागाच्या एसपी अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निरीक्षक नारायण पवारांच्या ॲक्शनमुळे नागरिकांतून कौतुक होत आहे.



















