सोलापूर – स्व. सिद्धा पाटील स्मृती समिती आणि नाट्य आराधना, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात ‘संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात हुबळी येथील सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांच्या सुमधुर गायनाचा त्रिवेणी संगम सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे.
बालगंधर्वांचे निस्सिम चाहते कै. सिद्धा (एस.एम.) पाटील यांची यंदा २८ वी पुण्यतिथी असून, २०२६ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. गेली २७ वर्षे पाटील परिवारातर्फे संगीत आणि नाट्य क्षेत्रातील विविध दर्जेदार कार्यक्रम सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून यंदा विशेष सांगितिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी कै. सिद्धा पाटील यांचे जुने स्नेही तथा अ.भा. मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष, निर्माते विजयकुमार साळुंके आणि ज्येष्ठ नाट्यकलाकार व प्रकाश योजनाकार शशिकांत बटाणे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. सोलापूरचे ज्येष्ठ नाट्यकलाकार व संवादिनी वादक प्रफुल्लचंद्र आहेरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या शुभहस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होईल.
*शास्त्रीय संगीताची मेजवानी*
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले पंडित कृष्णेंद्र वाडीकर हे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य कै. पं. श्रीपती पाडिगार यांचे शिष्य आहेत. किराणा घराण्याच्या गायकीचा वारसा जपणाया वाडीकर यांनी देश-विदेशातील अनेक महोत्सवात आपल्या गायनाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या ‘संगीत संध्या’ कार्यक्रमात ते संतवाणी, अभंग, नाट्यसंगीत आणि ठुमरी सादर करणार आहेत. त्यांना ओंकार पाठक (अक्कलकोट) हे संवादिनीवर, तर नितीन दिवाकर तबल्यावर साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन मंजुषा गाडगीळ करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य व खुला असून, जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी या सुश्राव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. आर. एस. तथा बाबू पाटील यांनी केले आहे.



















