वैराग – धर्माच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिखांचे नववे गुरु, हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद शताब्दी समागम दिनाच्या प्रचारार्थ संपूर्ण देशात धार्मिक रथाचे भ्रमण होत आहे. या निमित्ताने आज शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी वैराग शहरात या धार्मिक रथाचे आगमन झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रथाचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले.
या रथाचे पूजन भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग सोलापूर जिल्हा पश्चिमचे जिल्हा प्रवक्ते प्रफुल्ल भालशंकर आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रखंडप्रमुख सत्यवान ताटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप पंचायत राज व ग्रामीण विकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबाळकर, शिवम थोरात यांच्यासह वैराग शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैराग शहरातील प्रमुख चौकांमध्ये हा रथ थांबवण्यात आला होता. या रथामध्ये लावण्यात आलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या जीवनावरील आणि त्यांच्या बलिदानावरील प्रेरणादायी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यांच्या त्यागाचा इतिहास आणि माणुसकीसाठी त्यांनी दिलेला लढा याची माहिती या निमित्ताने नागरिकांना मिळाली.
भाविकांचा प्रतिसाद
शहरातील मुख्य मार्गावरून रथाचे मार्गक्रमण होत असताना नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. “बोले सो निहाल, सत् श्री अकाल” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. शीख धर्मगुरूंचा हा गौरवशाली इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


















