सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. महापौर पदासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) तसेच एमआयएमकडून प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाकडून महापौर पदासाठी अपेक्षितपणे विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत नंतर आज सोमवारी महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली. सोलापूर महापालिकेतील कौशल हॉल इमारतीतील नगरसचिव कार्यालयात नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे सकाळी दहा ते साडेअकरा वाजेपर्यंत त्या त्या पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
सकाळी पावणेदहा वाजल्यापासून भाजप पक्षाचे नगरसेवक महापालिकेत आले. कौन्सिल हॉल इमारतीच्या पायरीचे दर्शन घेऊन अनेकांनी प्रवेश केला. नगरसेविका आपल्या पती समवेत दाखल झाल्या. काही सदस्य आलिशान चार चाकी गाडीतून तर काहीजण दुचाकी करून महापालिकेत आले असल्याचे दिसून आले. तर काही सदस्य रिक्षातून आले असल्याचे पाहायला मिळाले.
भाजपाचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी यावेळी उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. यामुळे बहुतांश नगरसेवक पालिकेत उपस्थित झाले होते. प्रारंभी महापालिकेतील गटनेत्यांचे कार्यालय असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात भाजप नगरसेवकांची बैठक झाली. आवश्यक त्या सूचना यावेळी गटनेते नरेंद्र काळे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिल्या. त्यानंतर उमेदवार, सूचक – अनुमोदक यांच्यासह गटनेते नरेंद्र काळे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी नगरसचिव कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केले. शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमच्या उमेदवारांनी ही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
महापौर पदासाठी भाजपतर्फे विनायक रामकृष्ण कोंड्याल यांनी नामनिर्देशन दाखल केले आहे. त्यांच्या पहिल्या अर्जावर संजय बसप्पा कोळी सूचक तर श्रीकांचना रमेश यन्नम अनुमोदक आहेत. तसेच कोंड्याल यांनी दुसरा अर्जही दाखल केला असून त्यावर बिज्जू संगप्पा प्रधाने सूचक तर सात्विक प्रशांत बडवे अनुमोदक आहेत.
शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून प्रियदर्शन बाळासाहेब साठे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर अनिकेत शिवाजीराव पिसे सूचक तर अमोल बाळासाहेब शिंदे अनुमोदक आहेत.
तर एमआयएमकडून तौफिक बाबुमियाँ हत्तुरे यांनी नामनिर्देशन दाखल केले असून सफिया महम्मद शफीक चौधरी सूचक तर अकिला अ. कादर भागनगरी अनुमोदक आहेत.
उपमहापौर पदासाठी यांनी
दाखल केले उमेदवारी अर्ज
दरम्यान, उपमहापौर पदासाठी भाजपाकडून ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर बसवराज रामण्णा केंगनाळकर सूचक तर अश्विनी मोहन चव्हाण अनुमोदक आहेत.
शिवसेना (शिंदे गट) कडून उपमहापौर पदासाठीही प्रियदर्शन बाळासाहेब साठे यांनी अर्ज दाखल केला असून अमोल बाळासाहेब शिंदे सूचक व अनिकेत शिवाजीराव पिसे अनुमोदक आहेत.
तर एमएमएमकडून आसिफ अहमद पीर अहमद शेख यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केली असून वहिदा बानो कासिम साब शेख सूचक तर अकिला अ. कादर भागनगरी अनुमोदक आहेत.
महापौर व उपमहापौर पदासाठी एकाहून अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून, आता सर्वांचे लक्ष छाननी व मतदान प्रक्रियेकडे लागले आहे. एकूणच पक्षीय बलाबल पाहता ऐनवेळी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन
ओम्बासे यांनी दिली भेट
महापौर – उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेवेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सभागृहातील नगरसचिव कार्यालयास भेट दिली. अर्ज प्रक्रियेची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
विशेष घडामोडी अशा…..
* अनेक नगरसेवकांनी कौन्सिल हॉल सभागृहाच्या पोर्चमधील पायरीचे दर्शन घेतले
* कुणी सदस्य चार चाकी, दुचाकी तर कोणी रिक्षातून आले
* काही जणांनी गळ्यात भाजप पक्षाचा शेला घातला
** सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी उमेदवार विनायक कोंड्याल यांचे पालिकेत आगमन
** नगरसेविकांसमवेत पतीराजही आले..
** शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांच्या समवेत आले काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे
*** अनुपस्थित नगरसेवकांबद्दल अहवाल पाठवणार असल्याचे समजतात भाजपचे तीन-चार नगरसेवक उशिरा आले


















