करकंब – नागपूर येथे ५३व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात विशाल विष्णुदास रेपाळ उपशिक्षक जि.प.प्रा.शाळा अलंकापुरी करकंब यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.त्यांनी तयार केलेल्या माझी गणित शाळा’ या साहित्यास राज्यात चतुर्थ क्रमांक मिळाला.
राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांमधून जि.प.शाळेतील शिक्षकाने बनवलेल्या गणित शाळेचे राज्य स्तरावर त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्यापन प्रभावी व दर्जेदार करणे,तणावमुक्त शालेय वातावरण निर्माण करणे,मूलभूत गणितीय कौशल्य विकसित करणे,विद्यार्थ्यांची स्वयंअध्ययनातील रुची वाढवणे,गणिताच्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनगणित शाळा हे साहित्य तयार करण्यात आले आहे.
या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी,टाकाऊ पासून टिकाऊ,अत्यल्प खर्च,एकाच साहित्यात अनेक संकल्पना, विद्यार्थ्यांना सहज हाताळता येतात.सर्वच वयोगटातील मुलांना आकर्षित करणारे,विविध विषयांसाठी हे साहित्य खूपच उपयुक्त आहे.
या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळते.गणित कौशल्यांचा विकास होतो.अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ होते. तार्किक विचारशक्ती विकसित होते. सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढते.स्पर्धा परीक्षेची तयारी होते. स्वयंअध्ययनाची सवय लागते.
शिक्षक विशाल रेपाळ यांनी पाच वेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला.त्यापैकी तीन वेळा त्यांनी राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त केली आहेत. या यशाबद्दल पंढरपूर तालुका गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,जिल्हा विज्ञान मंडळाचे पदाधिकारी,पेहे केंद्र केंद्रप्रमुख दशरथ मोरे,पेहे,करकंब केंद्र, तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षक विशाल रेपाळ यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
























