करकंब – थंडीचा महिना आटोक्यात आल्यानंतर सर्वांनाच कोवळा, लुसलुशीत, गुळभेंडीचा, कुचकूचीचा आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांनी खवय्यांची हाऊस भागवणारा, नातेसंबंध व मैत्रीचे धागे दृढ करणाऱ्या महाराष्ट्रातील कृषी जीवनातील सांस्कृतिक अंग असणाऱ्या हुरड्याची आठवण होते.त्यावेळी आपली पावले आपोआपच मोहरलेल्या आंब्याच्या साक्षीने काळ्याशार मातीची ढेकळे तुडवत ज्वारीच्या शेतांकडे वळतात.हुरडा पार्टीमध्ये वांगी, शेंगाची, खोबऱ्याची चटणी, गुळाचा खडा आणि गोवऱ्यांच्या निखाऱ्यावरून काढलेले ज्वारीचे कणीस तळहातावर चोळून राख फुंकत हातातील हुरडा खाण्याचा आनंद काही औरच असतो.त्या अनुषंगानेच रोटरी क्लब ऑफ करकंब यांनी आयोजित केलेली पारंपरिक हुरडा पार्टी अत्यंत आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाली.
या हुरडा पार्टीमध्ये रोटरी क्लब ऑफ करकंबचे अध्यक्ष रो.डॉ.अक्षय मोरे,सचिव रो.लक्ष्मण जाधव, रो.डॉ.प्रशांतमोरे,रो.रघुनाथ जाधव, रो.धनंजय इदाते,विश्वजित मोरे, प्रकाश मोरे,प्रदीप मोरे,संदीप मोरे, छाया मोरे,जया इदाते व बागोपाळही उपस्थित होते.निसर्गाच्या कुशीत, शेतातील हिरवळीवर बसून कोवळ्या ज्वारीच्या हुरड्यासोबत गरमागरम भजी, ठेच्याच्या व चिंचेच्या चटण्या आणि गोड गुळाचा स्वाद घेताना सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते. घरगुती चव,मातीचा सुगंध आणि आपुलकीच्या गप्पांनी वातावरण अधिकच जिव्हाळ्याचे झाले.
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी या साध्या पण मनाला भिडणाऱ्या क्षणांचा मनमुराद आनंद घेतला.दैनंदिन धावपळीतून थोडा वेळ बाजूला काढून नाती घट्ट करण्यासाठी आणि परंपरेचा सन्मान राखण्यासाठी हा मेळावा अत्यंत अर्थपूर्ण ठरला.डॉ.प्रशांतकुमार मोरे यांच्या फॉर्म हाऊसवर या हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
ज्वारीचे आहारातील महत्त्व.
ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पोट साफ राहते.पोट भरल्यासारखे वाटून भूक कमी लागते.त्यामुळे आपोआपच आहारावर नियंत्रण येते.याचा वजनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.तंतुमय पदार्थ जास्त असल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते.
ज्वारीतर मोठ्या प्रमाणात लोह असते.हुरड्यावर लिंबू पिळलेकी लिंबातील क जीवनसत्वामुळे लोह सहजपणे शरीरात शोषले जाते. ज्वारीत कर्बोदके जास्त असल्याने ती शक्तीवर्धक असते.ज्वारीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना ज्वारी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.
ज्वारीच्या हुरड्याप्रमाणेच याच काळात गव्हाच्या ओंब्या भाजून हुळा खाण्याचा तसेच मराठवाड्यात ज्याला टहाळ म्हणतात तो हरभरा भाजून खाण्याचा आनंदही खूप वेगळाच आहे.
























