सोनखेड – लोहा तालुक्यातील व सोनखेड येथून जवळच असलेल्या जवळा (देशमुख) येथील माता रमाई विचार मंच व माता रमाई जयंती मंडळ यांच्या वतीने दिले जाणारे यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये पूज्य भंते बौद्धीधम्मो यांच्या आई सरस्वतीबाई लक्ष्मणराव पोवळे (वसरणी, नांदेड), ख्यातनाम पत्रकार राजेश्वर कांबळे यांची आई निर्मलाबाई कांबळे (कंधार), सुनिता डोंगरे (उमरी), सुकांता वागरे, समता सैनिक दैवशाला मस्के (माळाकोळी), लक्ष्मीबाई जमराज (पिंपरण), जिजाबाई गोडबोले (बळीरामपूर, नांदेड) या मातांचा समावेश आहे.
दरवर्षी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने 7 फेब्रुवारी या दिवसाचं औचित्य साधून 7 मातांचा सन्मान जवळा ता.लोहा येथील माता रमाई विचारमंच व रमाई जयंती मंडळाच्या वतीने करण्यात येतो. कारण त्यागमूर्ती माता रमाईने आपल्या संसारामध्ये अतिशय त्यागमय जीवन जगून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर साथ दिली. त्याचे प्रतीक म्हणून, त्याग करून मुलं घडविलेल्या मातांना निवड समितीच्या वतीने प्राधान्य देण्यात येत असते. त्यामध्ये भंतेजीची माता, पत्रकारांची माता, सैनिक माता, मुलं घडविलेल्या माता, अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मातांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल, शाल, पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येत असतो.
अतिशय आगळावेगळा हा सन्मान सोहळा जवळा (दे) ता.लोहा येथील त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त ७ फेब्रुवारी रोजी विश्वशांती बुद्ध विहार, जवळा या ठिकाणी अतिशय थाटामध्ये पार पडणार असल्याची माहिती रमाई विचार मंचाचे आनंद गोडबोले (भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण सचिव, नांदेड तथा आकाशवाणी प्रासंगिक निवेदक नांदेड व जयंती मंडळाच्या अध्यक्षा भारतबाई निखाते यांनी दिली.


















