सोलापूर – महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज मजरेवाडी विजापूर रोड सैफुल आणि विडी घरकुल परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. मजरेवाडी येथील म्हेत्रे टॉवर जवळील रस्त्याला अडथळा ठरणारे वॉल कंपाऊंड जमीनदोस्त करण्यात आले. विजापूर रोड आणि विडी घरकुल परिसरातील भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज सकाळी आणि संध्याकाळी या दोन सत्रात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. मजरेवाडी येथील म्हेत्रे टॉवर जवळील रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले वॉल कंपाऊंड जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. महापालिका नगर रचना विभाग आणि अतिक्रमण विरोधी पथक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. यामुळे येथील रस्त्यावरील अडथळा दूर झाला.
त्यानंतर विजापूर रोड सैफुल या भागामध्ये रस्त्याच्या कडेला, फुटपाथ वर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले. त्याचबरोबर विडी घरकुल परिसरातही रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांनाही हटविण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. भाजी विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करू नये. रस्त्याला अडथळा आल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याला अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती आणि इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.
















