पंढरपूर – नगरपरिषद निवडणूक प्रचारामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.प्रणिता भालके यांनी विजयी झाल्यानंतर पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येईल, असे आश्वासन मतदारांना दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी कामास सुरुवात केली आहे. पंढरपूर शहरांमध्ये शुक्रवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये सुमारे पाचशेहून अधिक नगर परिषदेचे कर्मचारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला दररोज ५० हजारापेक्षा अधिक भाविक येतात. तसेच नागरिक विविध ठिकाणी कामानिमित्त जात असतात. यामुळे पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर असणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके यांनी प्रचारांमध्ये आपण विजयी झाल्यानंतर पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर तसेचधूळ मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यामुळे मतदारांनी भालके यांना मतदान करून विजयी केले. आश्वासन दिल्याप्रमाणे नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी कामास सुरुवात केली आहे.
दरम्यान पंढरपूर शहरात शुक्रवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील पद्मावती उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विवेकवर्धिनी विद्यालय या ठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शाळांचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर दिसून आला आहे. यापुढेही पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि धुळमुक्त करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहोत. येथे येणारे भाविक पंढरपूरात आल्यावर त्यांना येथील स्वच्छता, रस्ते बघुन समाधान वाटले पाहिजे. पालिकेचे कर्मचारी नियमीत स्वच्छतेचे काम करीत असतात. मात्र यापुढे देखील वारंवार अशाच प्रकारे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.























