सोलापूर – महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ यांच्या वतीने योग विहार येथे सामूहिक ईष्टलिंग पूजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. मागील २२ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदाचे २३ वे वर्ष होते.
कार्यक्रमात सिद्धेश्वर देवस्थान येथील श्री पंचाक्षरी स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रोक्त पद्धतीने ईष्टलिंग पूजनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थित साधकांनी सामूहिक ईष्टलिंग पूजनात सहभाग घेतला. यावेळी स्वामीजींनी बारा ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पुरुष, महिला, तरुण वर्ग तसेच लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र मायनाळ यांनी शिवयोगाचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय संस्कृतीचे जतन व परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच अध्यात्मिक जागृती वृद्धिंगत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री निळकंठप्पा कोणापुरे व सचिव श्री बाबासाहेब कुलकर्णी उपस्थित होते. सहभागी साधकांना ताट, वाटी, बेलपत्र, अष्टगंध तसेच ईष्टलिंग पूजन साहित्य संस्थेतर्फे पुरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संस्थेचे संचालक श्री विश्वनाथ म्हेत्रे व श्री संतोष मंठाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच श्री चनबसप्पा अलमेल, श्री दयानंद माशाळकर, श्री सुभाष मुंडेवाडीकर, श्री राजू कुंभार, श्रीमती शिवलीला स्वामी व सौ. हिराबाई कुंभार यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






















