पंढरपूर – बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉर रद्द करावा, या मागणीसाठी रविवारी येथे तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने निदर्शन करण्यात आली. ‘एकच जिद्द, कॉरिडॉर रद्द’ अशा घोषणा देत यापुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. याचवेळी महाशिवरात्रीचे औचित्य साधून सर्व महादेव मंदिरांमध्ये महाआरती करून साकडे घालण्यात आले.
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो भाविक, वारकऱ्यांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी देशातील अन्य देवस्थानांच्या धर्तीवर ‘कॉरिडॉर’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गत श्री विठ्ठल मंदिर परिसरातील बाधित होत असलेल्या मालमत्ता धारकांची मते जाणून घेण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी झाल्या असून त्याविषयीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. दरम्यान, अनेक बाधित घटकांनी या कॉरिडॉरला विरोध केलेला आहे. वेळोवेळी, वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने करीत त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
(करीडॉर रद्द तीर्थक्षेत्र बचाव समिती)
महाशिवरात्रीचे औचित्य साधून तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने कॉरिडॉर बाधित भागात शिंदे सरकार वाड्याशेजारी असलेल्या श्री सोमेश्वर महादेव मंदिरात तसेच शेजारच्या पूर्वी विस्थापित झालेल्या श्री कोटेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर शहरातील अन्यही जुन्या महादेव मंदिरांमध्ये महाआरती, पूजा करून कॉरिडॉर रद्द होण्यासाठी साकडे घालण्यात आले. घोषणाबाजीसह निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक ओंकार जोशी यांनी, कॉरिडॉरची आजपर्यंतची सर्व प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. तीर्थक्षेत्र बचाव समिती व पदाधिकारी हे पंढरपूरला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनविण्यासाठी नागरिक व भाविकांच्या नेमक्या गरजा ओळखून, अधिकाधिक चांगल्या सूचना, प्रकल्प सादर करतील, त्याचा शासनाने गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर यांनी केले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. माऊली महाराज गुरव, कार्यवाह व्यंकटेश गलगलकर, गणेश लंके, अॅड. विनायक उंडाळ, वैभव बडवे, बालाजी महाजन, यशवंत बेणारे, धनंजय बडवे, बबन भागानगरे, वैष्णवी बडवे आदी उपस्थित होते.





















