सोलापूर : “शहर व हद्दवाढ भागातील रात्रीचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा तसेच ३० ते ३५ वर्षांपासून जुन्या झालेल्या ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन बदलण्याची कार्यवाही गतीने करावी,” अशा स्पष्ट सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. विभागीय कार्यालय क्र. ५ येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी शहरातील मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. शहरातील आर.टी.ओ. रोड, माशाळ नगर, दाते नगर, टाकळीकर मंगळ कार्यालय रोड, निलम नगर, धोबळे नगर, जमादार वस्ती आदी भागांतील रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची पातळी बिघडल्याने अपघात होत असल्याची बाब आमदारांनी निदर्शनास आणून दिली. संबंधित चेंबर समतल करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.
शहर व हद्दवाढ भागातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सकाळ व रात्रीच्या सत्रातील पुरवठा नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य व अंतर्गत रस्त्यांची नियमित स्वच्छता, नवीन एलईडी लाईट बसविणे व देखभाल कामे पूर्ण करणे, नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध भागांत ड्रेनेज लाईन टाकणे याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
निलम नगर (श्रमजीवी नगर) येथे १०० बेडचे महिला प्रसूतीगृह सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, छत्रपती संभाजी महाराज तलाव विकसित करणे, पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांतील समस्या सोडविणे, हद्दवाढ भागात भाजीमंडई उभारणे व प्रतापनगर तांडा येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे या विषयांवरही त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
विभागीय क्रमांक 5 चे कार्यालय जुळे सोलापुरात स्थलांतरित करावे
आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला विभागीय क्रमांक पाचचे कार्यालय जुळे सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या हे कार्यालय इतर भागात कार्यरत असून, विभागीय क्रमांक पाचमध्ये दक्षिण सोलापूर मतदारसंघातील जुळे सोलापूर परिसरातील मोठा परिसर येतो. त्यामुळे संबंधित नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी अधिक सोयीस्कर ठिकाणी कार्यालय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.























