सोलापूर – बार असोसिएशन, सोलापूर तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या विधी व्याख्यानमालेचा ज्ञानसमृद्ध व प्रेरणादायी प्रवास सातत्याने पुढे सुरू असून, या मालिकेतील तेरावे व्याख्यान दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता सोलापूर बार असोसिएशन हॉल येथे उत्साहपूर्ण व बौद्धिक वातावरणात संपन्न झाले.
या मालिकेतील तेराव्या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. अॅड. अश्विनी कुलकर्णी मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी “Prevention of Corruption Act, 1988” या अत्यंत महत्त्वपूर्ण व समकालीन विषयावर सखोल, अभ्यासपूर्ण आणि व्यवहार्य मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांची सविस्तर माहिती देत, तपास यंत्रणा, न्यायालयीन प्रक्रिया, पुराव्यांचे स्वरूप, तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयीन महत्त्वपूर्ण निर्णयांचा संदर्भ देत उपस्थित वकील बांधवांना अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्याची अंमलबजावणी करताना वकिलांनी घ्यावयाची काळजी, प्रत्यक्ष खटल्यांमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय यावरही प्रकाश टाकला. त्यांच्या सुस्पष्ट व प्रभावी मांडणीमुळे उपस्थित वकील बांधवांना या कायद्याचे व्यवहार्य ज्ञान मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख वक्त्यांचे स्वागत व सत्कार बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव आणि सहसचिवा अॅड. मीरा प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. वक्त्यांचा अल्पपरिचय खजिनदार अॅड. अरविंद देडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारचे सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी सहसचिवा अॅड. मीरा प्रसाद यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या व्याख्यानास बारचे माजी अध्यक्ष अॅड. विजय शिंदे, जेष्ठ वकील अॅड. विनोदकुमार दरगड, तसेच अॅड. संजय गायकवाड, अॅड. मल्लीनाथ पाटील, अॅड. रोहिदास पवार, अॅड. परवेज ढालयात, अॅड. C I वारद, अॅड. नागनाथ बिराजदार, अॅड. मनोज पामुल, अॅड. बसवराज बेरड, अॅड. निदा सैफन आदी उपस्थित होते.






















