सोलापूर : प्रख्यात कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक व ‘भारताची कोकिळा’ सरोजिनी नायडू यांच्या जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले.
द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ. शिल्पा दासरी चन्ना यांना प्रमुख प्रशिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासोबत श्रावणी मोरे, अक्षरा जाधव, तृप्ती अलदार, ज्ञानेश्वरी मोरे आणि संस्कृती बटाणे या पाच प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांच्या हस्ते प्रमुख प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. एस. एच. क्षीरसागर तसेच डॉ. के. सी. मुजावर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
महाविद्यालयाच्या लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह कु. तनुजा बिले व त्यांच्या समन्वयक कु. वैष्णवी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. हा उपक्रम महाविद्यालयातील ‘सिंहगड हिरकणी फोरम’ अंतर्गत आयोजित करण्यात आला असून, संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. एम. डी. लटके यांनी केले.
स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबतची जाणीव अधिक दृढ झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






















