सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित, मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल, सोलापूर येथे ‘आरंभ – द बिगिनिंग ऑफ स्ट्रेंथ, स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप’ या घोषवाक्याखाली पहिल्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ३.३० वाजता शाळेच्या प्रांगणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माउंट एव्हरेस्ट सर करणारे, लेखक व उद्योजक आनंद बनसोडे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, बँक व एनबीएफसी पॅनेल अॅड. अड. मनीष आडम आणि समाजसेवक पवन पडकी यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने व गार्ड ऑफ ऑनरने झाली. ऑलिम्पिक धाव, मशाल प्रज्वलन व ध्वजारोहण या पारंपरिक विधींनी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्च पास्ट सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर क्रीडा शपथ घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक ड्रिल्स सादर केल्या. नर्सरीच्या ‘टायनी स्टार ड्रिल’, एलकेजीची ‘रेनबो ड्रिल’, यूकेजीची ‘अॅनिमल किंगडम ड्रिल’, इयत्ता पहिलीची ‘पॉम-पॉम ड्रिल’ व इयत्ता दुसरीची ‘ग्रीन गार्डियन स्टिक ड्रिल’ यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी ‘बॉल ड्रिल’, ‘बांबू ट्राय-कलर ड्रिल’, ‘रिंग ड्रिल’ व ‘फ्लॉवर ड्रिल’ सादर करून संघभावना व शिस्त यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
पूर्व-प्राथमिक तसेच इयत्ता १ ते ५ च्या विद्यार्थ्यांसाठी धावण्याच्या शर्यती, रिले, लांब उडी, विविध ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. मल्लखांब व लाठी-काठी प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमात रोमांचक वातावरण निर्माण केले. तसेच पालकांसाठी विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
प्रमुख पाहुणे आनंद बनसोडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना क्रीडेमुळे आत्मविश्वास, जिद्द आणि संघभावना विकसित होते, असे सांगून यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व पदके प्रदान करण्यात आली. विविध हाऊसना गटचषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदेमातरम् व समूह छायाचित्रणाने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे सचिव शदशरथ गोप, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम , विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली, अंबादास गज्जम, श्री इप्पकायल, मधुकर कट्टा, संगिताताई इंदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. शाळेचे देणगीदार निलेश सरगम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना दासरी यांनी सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्नेहा म्याना केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिका वृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले .
पहिल्या वार्षिक क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून शाळेच्या क्रीडा परंपरेची ही दमदार सुरुवात ठरली आहे.




















