पंढरपूर – येथील चंद्रभागेच्या वाळवंटातील पुरातन भक्त (पुंडलिक) च्या मंदिरासाठी भक्ताने दिलेला सोन्याचा कळस शुक्रवारी मंदिराला अर्पण करण्यात आला. यावेळी वारकरी सांप्रदायातील मठाधिपती, महाराज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्वांचे पुंडलिकराज व महादेव देवस्थान मंदिराचे विश्वस्त, मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, विश्वस्त सतिश नेहतराव, उमेश संगीतराव, मारुती संगीतराव आदींनी स्वागत केले.
श्री संत गंगुकाका शिरवळीकर यांच्या शिष्य परंपरेतील अकलूज येथील अॅड. अनुजा व डॉ. सुशांत कोकाटे यांनी आपल्या मातोश्री विजयाताई विजयराव कोकाटे-पाटील यांच्या संकल्पनेतून व ह.भ.प. माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा साजरा झाला. शुक्रवारी सकाळी सुवर्णकळसाची शहरातील नगर प्रदक्षिणा मार्गावरुन सवाद्य
मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर अॅड. अनुजा व डॉ. सुशांत कोकाटे यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आला. तर ह.भ.प. कदम माऊली यांच्या हस्ते कळसारोहण करण्यात आले.यानंतर ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन संपन्न झाले. तर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अॅड. माधवीताई निगडे, आळंदी येथील योगी निरंजननाथ महाराज, ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर, श्री पुंडलिकराज व महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब अधटराव उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये ह.भ.प. हरी महाराज नामदास, बाळासाहेब महाराज देहूकर, संजय महाराज देहूकर, राणा महाराज वासकर, माधव महाराज शिवणीकर, विष्णू महाराज कबीर यांच्यासह वारकरी संप्रदाय पाईक संघ, श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, विश्व वारकरी संघाचे सदस्य उपस्थित होते.






















