सोलापूर – कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “माध्यमिक आणि उच्च शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका आणि भविष्य” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे माध्यमिक व उच्च शिक्षणामध्ये असणारी भूमिका व अध्यायावत तंत्रज्ञानाची भूमिका यासंदर्भात सखोल चिंतन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजशेखर हिरेमठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. राजशेखर हिरेमठ यांनी शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक दृष्टीने वापर केला पाहिजे असे मत मांडले. या परिषदेमध्ये श्री रविकिरण चव्हाण यांनी माध्यमिक शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची असणारी भूमिका व कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने या विषयावर व्याख्यान देत असताना प्रत्यक्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वैविध्यपूर्ण साधने यांचा वापर करून सविस्तर माहिती दिली. श्री संप्रीत पटेल यांनी उच्च शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या विषयांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात असणारी विविध सॉफ्टवेअर व त्यांचा क्षणामध्ये असणारा उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.
या परिषदेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन बोंदार्डे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणामध्ये योग्य रीतीने वापर केला व मानवी मूल्य यांची जपणूक केली तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमाने शिक्षणाची गती अधिक होईल याबाबत मार्गदर्शन केले.
या परिषदेत महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड, धाराशिव व पुणे जिल्ह्यातून 119 प्राध्यापकांनी सहभाग घेतला. तसेच या परिषदेमध्ये फक्त प्राध्यापकच नव्हे तर पीएच.डी. संशोधक व पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी हेही सहभागी झाले होते. प्रस्तुत परिषदेमध्ये 66 संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची शिक्षणातील भूमिका यासंदर्भात आपले संशोधन पेपर सादर केले तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशितही केले. या उद्घाटन समारंभासाठी सोलापूर विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाची प्रस्तावना परिषदेचे समन्वय डॉ. आयेशा रंगरेज यांनी केली. कार्यक्रमाचे आभार या परिषदेच्या सह समन्वयिका डॉ. गीता मासाळ यांनी केले.

























