दक्षिण सोलापूर – मंद्रूप ते श्रीशैल ६०० किलोमीटर पदयात्रेस मंगळवार २४ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे यांच्या पुढाकाराने मंद्रूप श्रीशैल पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. गेल्या ४० वर्षापासून ही पदयात्रा दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीशैल येथे पोहचते. २४ फेब्रुवारीला मल्लिकार्जुन मंदिरात माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे व लोकसेवा विद्यामंदिरचे प्राचार्य बसप्पा घाटे व संस्थेचे संचालक महादेव शिळ्ळे यांच्या हस्ते पालखीपूजन करून पदयात्रेस सुरूवात करण्यात आली.
२४ फेब्रुवारीपासून ते १६ मार्चपर्यंत भक्तगण पालखीसह दररोज ३० किलोमीटर पायी चालत जातात. महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यातून ही पदयात्रा जात असते. दरवर्षी या पदयात्रेत शेकडो भाविक सहभागी होत असतात. शिवाय कर्नाटक व तेलंगणा या दोन्ही राज्यात या पदयात्रेतील पालखीला विशेष महत्व असल्यामुळे भक्तगण पदयात्रेच्या प्रतीक्षेत असतात. दरवर्षी गुडीपाडवा मूहूर्तावर श्रीशैल दर्शन घेण्यासाठी २२ दिवस आधी या पदयात्रेला सुरूवात करण्यात येते. मंद्रूप व परीसरातील मल्लिकार्जून भक्तांसाठी गुरुसिध्द म्हेत्रे पदयात्रेचे आयोजन करतात. गुडीपाडवा दिवशी दर्शन घेऊन दोन दिवस मुक्कामी राहतात. त्यानंतर भाविक श्रीशैल येथून प्रस्थान करतात.
























