बार्शी – माईर्स एमआयटी पुणे संचालित बार्शी येथील एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक सप्ताहात रेट्रो डे, बॉलीवूड डे आणि पारंपरिक वेशभूषा दिन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांची प्रभावी झलक सादर केली.
पारंपरिक वेशभूषेतून भारतीय संस्कृतीची विविधता अनुभवायला मिळाली, तर रेट्रो आणि बॉलीवूड डे निमित्त सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्याचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचा उत्साह, ऊर्जा आणि त्यांच्या बहुआयामी प्रतिभेच्या दिमाखदार सादरीकरणाने हा सांस्कृतिक सप्ताह जल्लोषात पार पडला.
या सप्ताहाचा बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
विविध कला-गुणांना वाव मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहते तसेच संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम प्रमुख प्रा. जगनाडे तसेच प्रा. अनिकेत कारंडे, प्रा. सोनवणे, क्रीडा शिक्षक प्रा. अमोल मिरगणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थिनी नम्रता भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बोंडगे यांनी मानले.

























