बार्शी – एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन मराठी शाळेत ‘आनंद बाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या आनंद बाजारातून सुमारे ७० हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावून खाऊ गल्ल्या, फळे, भाजीपाला आदी वस्तूंची विक्री केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भारत बावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अनंत कवठाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुलाखे हायस्कूलचे प्राचार्य रामकृष्ण इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसन्न देशपांडे, प्रमुख पाहुणे राजश्री पाटील, व्यवस्थापन समितीच्या सदस्य गोसावी मॅडम, मुंडे सर, उपाध्यक्ष देशपांडे सर तसेच बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक सुरेश शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण वाघमारे यांनी केले. आपल्या भाषणात भारत बावकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते तसेच व्यवसायिक दृष्टीकोन विकसित होतो, असे सांगितले. अध्यक्ष अनंत कवठाळे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करुन भविष्यात अशा उपक्रमांना अधिक चालना देण्याचे आश्वासन दिले.
या आनंद बाजाराला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर खुने यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब ढेंबरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आर्थिक जाण आणि सामाजिक कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने हा ‘आनंद बाजार’ उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.





















