मंगळवेढा – तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर मंदिराजवळ असलेल्या भिमा नदीत जटाशंकर मंदिराजवळ पाण्यात बुडून अजय दिपक पुजारी(वय 23 वर्षे) या तरूणाचा मृत्यू झाला असून या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,यातील मयत अजय दिपक पुजारी (रा.ब्रम्हपुरी) हा माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात भीमा नदीच्या पात्रात गेला असता,जटाशंकर मंदिराजवळील पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पात्रात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही.याची खबर विजयकुमार पुजारी यांनी पोलिसात दिल्यानंतर या घटनेची नोंद पोलिसात झाली असून याचा अधिक तपास पोलिस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.
अधुरे राहिले स्वप्न
अजय हा एक अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी तरुण होता. तो पोलीस भरतीचे प्रशिक्षण माचणूर येथे घेत होता. खाकी वर्दी परिधान करून देशाची आणि समाजाची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, काळाने त्याच्यावर घाला घातल्याने हे स्वप्न आता कायमचे अधुरे राहिले आहे.
परिसरात हळहळ
अजयच्या अकाली निधनाची बातमी वार्यासारखी पंचक्रोशीत पसरताच ब्रह्मपुरी गावासह मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक उमदा आणि अभ्यासू मित्र गमावला त्याच्या पश्चात आई, वडील आणि मोठा परिवार असून, ऐन उमेदीच्या काळात मुलाचा असा अंत झाल्याने पुजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे भीमा नदीच्या पात्रात उतरणार्या पर्यटकांनी आणि तरुणांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.दरम्यान,यापुर्वीही पाण्याचा अंदाज न आल्याने येथे मृत्यू झाल्याच्या घटना आहेत.
























