बार्शी – पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी आज पार पडल्या. यात अपेक्षेप्रमाणे सभापतीपदी भाजपाच्या मीनाक्षी रोंगे तर उपसभापतीपदी संतोष निंबाळकर यांची बिनविरोध निवड पार पडली.
मीनाक्षी रोंगे यांच्या सूचक म्हणून किरण घुले यांनी तर संतोष निंबाळकर यांच्या सूचक म्हणून शरद बसवंत यांनी अनुमोदन दिले.
निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलसिंह भोसले हे होते. यावेळी गटविकास अधिकारी विवेक जमदाडे व सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर भोसले यांच्या हस्ते सभापती आणि उपसभापती यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर पंचायत समितीच्या प्रांगणात माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, कविता राऊत, बाजार समिती सभापती विजय गरड, उपसभापती बाबा गायकवाड, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष बबन गडदे, मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम, जिल्हा उपाध्यक्ष केशव घोगरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्याचा भौगोलिक समतोल साधला.
सभापती पदाची संधी ही राऊत यांनी त्यांचे जुने ज्येष्ठ सहकारी कै. विठ्ठल धस यांची मुलगी आणि माजी पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र धस यांची पुतणी मीनाक्षी रोंगे यांना तर उपसभापती देखील राऊत यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांचे सुपुत्र संतोष निंबाळकर यांना संधी देत उतराई केली. तसेच एक पद उत्तर बार्शी तर एक वैराग भागाला देऊन समतोल साधला आहे.
उपसभापती संतोष निंबाळकर यांनी राजाभाऊची मान उंचावेल असे काम करु, असा शब्द दिला. तसेच खेळीमेळीत निवडी पार पडल्याबद्दल सर्व सदस्य आणि नेतेमंडळी यांचे आभार मानले.
राजाभाऊ राऊत म्हणाले, सर्व सत्ता दिल्यामुळे मनापासून अभिमान वाटतो. सलग पाच टर्म सत्ता देणारा बार्शी हा एकमेव तालुका आहे.
पार्टीतील एकसंघपणा व कुटुंबाप्रमाणे चालवतो
तालुक्यातील सिनियर नेत्यांनी आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य केले. ज्येष्ठ सहकारी नेत्यांच्या मुलीला सभापती करण्याची संधी मिळाली याचा मोठा आनंद आहे. निष्ठा व प्रामाणिकपणा असेल तर संधी मिळते.जय पराजय होत असतात. विजयामुळे हुरळून जाऊ नये. जनतेशी बांधिलकी ठेऊन निष्ठेने काम करा. होणाऱ्या कामाचा शब्द द्या.कामधंदा पाहून राजकारण करा. नाही तर अडचणी येतात. पार्टीची शिस्त पाळा. पूर्वी काहीजणांनी कट कारस्थान केले. सुरात सूर मिसळले यामुळे धोका निर्माण झाला. फार मोठ्या अपेक्षेने तालुका पाहत आहे. कुणी कोणाची अवहेलना करु नये. पदाधिकाऱ्यावरही खोटे आरोप ही करु नका. अशा सूचना त्यांनी पदाधिकारी अन कार्यकर्ते यांना दिल्या. तालुका व राज्यातील सर्व सत्तास्थाने आपल्याकडे आहेत. मुख्यमंत्री यांना आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडली. सर्वांनी काळजीपूर्वक काम करा. झटलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान करा,असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संदीप मिरगणे यांनी केले तर आभार संजय भड यांनी मानले.
यांचा केला सत्कार
मीनाक्षी रोंगे (सभापती), संतोष निंबाळकर(उपसभापती)
सदस्य- संजय भड, राजेंद्र सुरवसे, भीमा गव्हाणे, शरद बसवंत, ऐश्वर्या महानवर, सुरेखा मुंडे, दीपक वैद्य, रेश्मा डोके, किरण घुले, भरती दराडे, नंदकुमार काळे, सुजाता डोईफोडे, विमल काटे, सोनाली बोधले, सविता साबळे, जयमाला जाधव या पंचायत समिती अन जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पडद्यामागे राहून पार्टीचे संघटनात्मक काम करणारे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांचा ही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.



























