सांगोला – पंचायत समिती मध्ये प्रथमच भाजपचा सभापती झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार दि.१७ मार्च रोजी मुंबई येथे नूतन सभापती पूनम इंगवले यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी सांगोल्यात ऑपरेशन लोटस यशस्वी करणारे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे, प्रशांत वलेकर, सुदर्शन इंगवले उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पूनम इंगवले यांना शुभेच्छा देताना पंचायत समिती म्हणजे ग्रामीण विकासाचे एक सक्षम साधन आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब गरजू आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याच्या सूचना दिल्या. तसेच यासाठी राज्याकडून लागेल ती मदत पुरवण्यात येईल असा शब्दही दिला. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही दोघांचा सत्कार केला.
सांगोला पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर अनेक वर्ष शेकापची एक हाती सत्ता होती. मात्र यंदा प्रथमच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यात ऑपरेशन लोटस राबवत माजी आ.शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुंखे पाटील या दोन मित्रांना एकत्रित आणत पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवला.
सांगोल्यात भाजपचा सभापती ; सांगोलकरांना मिळणार रिटर्न गिफ्ट
सांगोला पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपचा सभापती झाल्याने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोलकरांना मोठे रिटर्न गिफ्ट देण्याची घोषणा यावेळी केली. सांगोला पंचायत समितीसाठी लवकरच एक भव्यदिव्य आणि सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत उभी करण्याचा शब्द त्यांनी दिला. लवकरच या इमारतीचे भूमिपूजन होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
























