सोलापूर – “पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी नागरिकांनी केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणे आवश्यक आहे. विशेषतः 3R (Reduce, Recycle, Reuse) या संकल्पनेचा अवलंब करून प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळल्यास आपण निसर्गाचे रक्षण करू शकतो, त्यासाठी पर्यावरण रक्षण लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा सेवानिवृत्त आयएएस तथा यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
जागतिक वन दिनानिमित्त युगंधर फाउंडेशन, सोलापूरच्या वतीने आयोजित ‘युगंधर नवरत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्यात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील नऊ रत्नांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी सिंगल युज प्लास्टिकला कडाडून विरोध करण्याचे आवाहन करत पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळीची गरज व्यक्त केली.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. आशा रोकडे, केअर फाउंडेशन (पुणे) चे अवधूत कदम आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या सहाय्यक वनरक्षक शुभांगी जावळे यांची उपस्थिती होती.
युगंधर फाउंडेशनच्या दशकपूर्ती निमित्त संस्थेचा १० वर्षांचा कार्यअहवाल मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. संस्थेने गेल्या १० वर्षांत पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा प्रा. रेश्मा माने यांनी प्रास्ताविकात केले.
शाल, सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला नागरिक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा शर्मा यांनी केले, तर आभार संस्थेच्या खजिनदार सुप्रिया माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युगंधर फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
—
युगंधर नवरत्न पुरस्काराचे मानकरी
पर्यावरण संतोष धाकपाडे
कला-सचिन जगताप
आरोग्य – डॉ. व्यंकटेश मेतन
पत्रकारिता- विजय गायकवाड
शिक्षण- प्रा. डॉ. युवराज सुरवसे
उद्योग- सविता जुजगार
महिला व बालकल्याण-ऍड. सरिता मोकाशी
कृषी- डॉ. स्वाती थिटे
क्रीडा – श्रेया परदेशी
विशेष सन्मान: युवा प्रेरणा पुरस्कार: पंकज सुतकर (पर्यावरण व संशोधन)
सामाजिक बांधिलकी पुरस्कार: सारथी युथ फाउंडेशन (सोलापूर) व वृक्ष संवर्धन समिती (बार्शी)
विशेष सत्कार: वनसेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी.






















