सोलापूर – जन्मतःच डोळे नसलेल्या तस्कर सापाची संशोधनात्मक नोंद 20 मार्च 2026 रोजी प्रकाशित झालेल्या अमेरिकेतील रेपटाईल्स अँड अँफीबियन्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये झाली आहे. सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे आणि पुण्याचे अनिल कानस्कर यांच्या संयुक्त संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
पुणे येथील सुतारवाडी, पाषाण परिसरात 19 डिसेंबर 2024 रोजी एका रेस्क्यू कॉलदरम्यान हा साप पकडण्यात आला. हा तस्कर जातीचा साप असून त्यामध्ये डोळे पूर्णतः अनुपस्थित असल्याचे आढळले. सुमारे 20 सेंमी लांबीच्या या सापाच्या डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले होते. तेथे डोळ्यांची बाहुलीच नव्हती. तसेच त्याच्या जबड्याच्या रचनेतही काही प्रमाणात विकृती दिसून आली. या घटनेची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना देण्यात आली. त्यांनी हा साप विचित्र दिसत असला तरी यावर संशोधनात्मक नोंद होणे गरजेचे असल्याचे सांगितले. हे जन्मजात दोषाचे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या विकृतीला शास्त्रीय भाषेत ‘बायलॅटरल अनऑफथालमिया’ असे म्हणतात. बायलॅटरल म्हणजे दोन्ही बाजूला आणि अनऑफथालमिया म्हणजे डोळे अनुपस्थित असणे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची ही विकृती सापांमध्ये अत्यंत दुर्मिळ असून, तस्कर या सापामधील ही पहिली नोंद आहे. त्यामुळे या संशोधनाला सर्पशास्त्र आणि प्राणीजन्य विकृतींच्या अभ्यासात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही जन्मजात विकृती भ्रूणावस्थेत डोळ्यांची निर्मिती न होणे किंवा त्याचा विकास अर्धवट राहणे यामुळे निर्माण होते. यामागे जनुकीय किंवा पर्यावरणीय घटक कारणीभूत असू शकतात. या सापाच्या शारीरिक विकृती असूनही तो अन्य बाबतीत निरोगी दिसत होता. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या संशोधनासाठी पुणे वनविभागाचे सहकार्य लाभले असून पुण्याचे रफीक शेख आणि गणेश माने यांचे सहकार्य लाभले. या संशोधनामुळे सापांमधील जन्मजात विकृती आणि त्यामागील कारणांचा अभ्यास करण्यास मदत होईल. स्थानिक पातळीवर केलेले निरीक्षण जागतिक स्तरावर पोहोचू शकते, हे यामुळे स्पष्ट झाले. सर्प अभ्यासक राहुल शिंदे आणि अनिल कानस्कर यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील सर्प संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली असून, स्थानिक पातळीवरील अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा सापाची नोंद होणे ही मोठी वैज्ञानिक बाब आहे. ही एक जन्मजात (congenital) अवस्था आहे. भ्रूणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात डोळ्यांची प्राथमिक रचना तयार होत नाही किंवा तयार होऊन नंतर नष्ट होते. त्यामुळे डोळे विकसित होत नाहीत. सापांमधील ही अवस्था अत्यंत दुर्मिळ असून या संशोधनामुळे सापाच्या भ्रूणविकासाच्या अभ्यासात महत्वाची नोंद ठरली आहे.
*-सर्प अभ्यासक राहुल शिंदे.*
“रेस्क्यू दरम्यान अशा वेगळ्या वैशिष्ट्यांचा साप आढळणे हे आमच्यासाठीही अनोखे होते. मी पकडलेल्या या तस्कर सापाला डोळे नसल्याचे पाहून याची माहिती घेण्याकरिता सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा प्रकार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून या सापाचे योग्य निरीक्षण करून त्यावर संशोधन करता आले, ही आनंदाची बाब आहे. या संशोधनात सहभागी असणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.”
*-अनिल कानस्कर, पुणे.*























