पंढरपूर – शहरातील सरगम चौक भरधाव वेगाने निघालेल्या कारमधुन पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचा चार किलो गांजा व गांजाची वाहतूक करणारी सुमारे पाच लाख रुपये किंमतीची कार असा एकुण ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान गाजांची वाहतूक करणाऱ्या एकाला जेरबंद करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.
या कारवाई संदर्भात सविस्तर माहिती देताना उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी सांगितले की,चैत्री यात्रेचा बंदोबस्त करीत असताना येथील केबीपी चौका मध्ये एक कार भरधाव वेगाने जात असलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी या कारचा पाठलाग केल्यानंतर सरगम चौक येथे वाहतूक कोंडीमध्ये ही कार थांबली. यावेळी कार ( नं.एमएच – १३ बीएन ४८६८) मध्ये तब्बल तीन किलो ९०० ग्रॅम इतका गांजा पोलिसांना आढळून आला. यानंतर तात्काळ पोलिसांनी कारचालक माणिक चौगुले ( रा.नारायणचिंचोली,ता.पंढरपूर ) यास कारसह ताब्यात घेतले.
दरम्यान या कार मध्ये तब्बल ८० हजार रुपये किंमतीचा गांजा आणि पाच लाख रुपये किमतीची गांजाची वाहतूक करणारी सुमारे पाच लाख रुपये किंमतीची स्विफ्टडिझायर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही कारवाई पंढरपूर पोलिसांकडून करण्यात आली. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे तसेच शहर पोलिस ठाण्यातील इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

















