पंढरपूर – शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या माध्यमातून पंढरीची वारी मंगळवारी (ता.३१) रायगडच्या द्वारी अशा घोषणा देऊन रायगड कडे रवाना झाले. विशेष म्हणजे यावर्षी तब्बल साडेपाचशेच्यावर महिला आणि पुरुष या मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती येथील शिवभक्त प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्रीराम गणपुले यांनी दिली.
या मोहिमे संदर्भात माहिती देताना गणपुले यांनी सांगितले की, तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरातून शिवभक्त प्रतिष्ठानची दुर्ग मोहीम प्रतिवर्षी रायगडला जाते. यंदाच्या वर्षी तब्बल ५७० तरुण स्त्री-पुरुष हे रायगड साठी पंढरपुरातून रवाना झाले आहेत.
रायगडभूषण पुरस्कार प्राप्त येथील शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसमाधी नतमस्तक दुर्गमोहिम रायगड कडे मार्गस्थ होत आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणावर शिवभक्त रायगड कडे मार्गस्थ होत आहेत. ही परंपरा जवळजवळ २५ वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे. पंढरीची वारी रायगडच्या व्दारी या उपक्रमाव्दारे आम्ही दरवर्षी ही मोहिम राबवित असतो. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर बळकट करावयाचे असतील तर प्रत्यक्ष गडकिल्यांवर जावुन गड किल्यांना भेटी देवून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. हीच भावना मना मध्ये ठेवून आम्ही ही शिवसमाधी नतमस्तक दुर्गमोहिम राबवित असतो.
विशेष म्हणजे रायगडावर गेल्यावर गडपूजन, व्यसनमुक्तीची शपथ आणि विशेष म्हणजे एक दिवस गडस्वच्छता अभियान देखील राबविले जात असते. होळीच्या माळावरच्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पुजन, जगदिश्वराची आणि शिवसमाधीचे पूजन करुन सर्व शिवभक्त पंढरपूरकडे रवाना होत असल्याचे देखील श्रीराम गणपुले यांनी सांगितले.
——————-
११ बसगाड्या आणि ३ जीप मधून शिवभक्त रवाना
यंदाच्या वर्षी येथून ११ बसगाड्या आणि तीन जीप गाड्यातून सुमारे ५३० शिवभक्त रायगड मोहिमेवर निघालेले आहेत. विशेष म्हणजे या मध्ये १७० मुली आणि महिला आणि सुमारे ४०० च्या आसपास पुरुष आणि मुले सहभागी झालेली आहेत. रायगडावर आमचे सर्व धारकरी, वारकरी दिंडीसह शिवसमाधीवर नतमस्तक होणार आहेत.


















