किनवट – तालुक्यातील गोकुंदा येथे कार्यरत असलेल्या गॅस एजन्सीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित एजन्सीची अधिकृत मंजुरी सारखणी (ता. किनवट) येथे असताना, शासनाच्या नियमांनुसार ज्या ठिकाणी मंजुरी आहे त्याच ठिकाणी गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात मात्र ही एजन्सी सारखणी व गोकुंदा(किनवट )येथे व्यवहार करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, गोकुंदा येथे नागरी वस्तीला लागूनच गॅस सिलेंडर साठवणूक व वितरण केले जात असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याचबरोबर मागील काही दिवसांपासून गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवत असून ग्राहकांना सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.
सिलेंडर उपलब्धतेतील अनियमिततेमुळे काळाबाजार होत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आली आहे.ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे आणि सचिव दिलीप पाटील यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा व हक्कांचा प्रश्न लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी तात्काळ हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

















