सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे पाच दिवसीय इनोव्हेशन, डिझाईन अँड एंटरप्रेन्योरशिप (IDE) बूटकॅम्प 2026 ला उत्साहात प्रारंभ झाला.
दि. ६ ते १० एप्रिल दरम्यान होणारा हा उपक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल (MIC) यांच्या पुढाकारातून, वाधवानी फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या बूटकॅम्पसाठी सिंहगड संस्थेची राष्ट्रीय पातळीवर ‘नोडल सेंटर’ म्हणून निवड झाल्याने नवोपक्रम क्षेत्रातील संस्थेच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. देशभरातील ३० केंद्रांवर तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सुमारे ६,५०० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून, सोलापूर केंद्रात २०० ते २५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
उद्घाटन कार्यक्रमात AICTE इनोव्हेशन सेंटरचे रीजनल कन्सल्टंट सौरभ निर्माले यांनी बूटकॅम्पचा उद्देश स्पष्ट करताना, “विद्यार्थ्यांनी नवकल्पना विकसित करून त्याचे उत्पादनात रूपांतर करावे आणि स्टार्टअपच्या दिशेने वाटचाल करावी,” असे सांगितले. यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, रिसर्च डायरेक्टर प्रा. एस. एच. पवार, तसेच प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. पवार यांनी ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या संधींबाबत माहिती देत संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. लक्ष्मी हायड्रॉलिक्स लि.चे अध्यक्ष निरंजन सिंघवी यांनी नवीन उत्पादन विकास, त्याचे कॉस्टिंग आणि बाजारातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले.
वाधवानी फाउंडेशनच्या मास्टर ट्रेनर्स श्रीमती पल्लवी बिरादार आणि डॉ. सायरील क्रिस्टो यांची उपस्थिती विशेष ठरली असून ते संपूर्ण बूटकॅम्पदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनिल शाखापुरे व डॉ. मुदस्सर नाईकवाडी यांचे नियोजन लाभले. सूत्रसंचालन प्रा. मानसी जाधव यांनी केले.
या बूटकॅम्पमध्ये प्रत्यक्ष समस्यांवर आधारित कार्यशाळा, तज्ज्ञांचे सत्र, स्टार्टअप संस्थापकांचे मार्गदर्शन आणि टीमवर्कच्या माध्यमातून नवोपक्रमात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. चौथ्या दिवशी स्थानिक इनोव्हेशन इकोसिस्टम व सांस्कृतिक स्थळांना भेट, तर पाचव्या दिवशी फंडिंग संधी व बौद्धिक संपदा हक्क (IPR) यावर विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. अंतिम दिवशी पिचिंग सत्र होऊन उत्कृष्ट संघांचा गौरव करण्यात येणार आहे.
✓ बूटकॅम्पमधील प्रमुख उपक्रम :
• तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र
• डिझाईन थिंकिंग व नवोपक्रम कार्यशाळा
• आयडिया जनरेशन व समस्या निराकरण उपक्रम
• स्टार्टअप मेंटरिंग सत्र
• इन्क्युबेशन सेंटर भेट
• आयडिया पिचिंग व मूल्यांकन प्रक्रिया
° हा बूटकॅम्प केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना दिशा देणारा आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.


















