सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शालेय रग्बी (१४ वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली. या शिबिरानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ ६९ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेसाठी भुवनेश्वरकडे (ओरिसा) रवाना झाले.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर २ ते ६ एप्रिल या कालावधीत हे शिबीर पार पडले. या शिबिराचा सांगता समारंभ पार्क स्टेडियम येथील हॉलमध्ये महानगरपालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी
सत्येन जाधव, जिल्हा रग्बी संघटनेचे अध्यक्ष भिमराव बाळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी केले. तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड यांनी आभार मानले. खेळाडूंच्या निवासासाठी सोय उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिका, क्रिकेट संघटना आणि सराव मैदानासाठी सहकार्य करणाऱ्या हरिभाई देवकरण प्रशालेचे जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आभार मानण्यात आले.
——–
महाराष्ट्राचा नावलौकिक करा
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “९ ते १० एप्रिल दरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकावावे आणि राज्याचा नावलौकिक करावा.” तसेच नजीर शेख यांनीही मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही पदक मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.
——-
साईनाथ मगदूम व अनुष्का कुटे कर्णधार
महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी साईनाथ मगदूम व अनुष्का कुटे यांची निवड करण्यात आली
असा आहे महाराष्ट्र संघ : मुले: वीरधवल साळवी, साईनाथ मगदूम, सिद्धेश माने, प्रथमेश सुरवसे, ज्योतीराम निवाळकर, आर्यन येळवे, नयन हटकर, गगन झा, सत्यजित कोळपटे, ऋतुराज बेनाडे, दीपांशू रोहिदास, सार्थक शिंदे.
मुली: शिवक्रांती गायकवाड, पूर्वी खामकर, जानवी पोरजे, श्रुती मांडवे, अनुष्का कुटे, तन्वी वाडिवे, ऋतिका रायकर, सानवी माने, जानवी राऊत, अमृता सावंत, युनिका सांदेकर, श्रेया पाटील. प्रशिक्षक: सोनाली शेलार. संघ व्यवस्थापक: राहुल गायकवाड.

















