सोलापूर : शहरात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त मंगळवारी नव्हे तर रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाशी चर्चा झाली. एक बेस, एक टॉप, क्लिअर साऊंड या मिरवणुकीत राहणार आहे. मिरवणूक मार्गावर प्रत्येक चौकात प्रत्येक मंडळांनी केवळ पंधरा मिनिटे थांबविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या कोणत्याही गाड्यांचा ताफा मिरवणुकीत येणार नाही यावर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीचे राजाभाऊ सरवदे आणि राजाभाऊ इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने काही दिवसांपूर्वी पारंपारिक रविवारी ऐवजी मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी मिरवणूक करण्याचा निर्णय बैठकीत जाहीर केला होता. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने रविवारीच मिरवणूक काढण्यासंदर्भात लोकभावना व्यक्त झाली होती. दरम्यान, आज भारतरत्न डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली निर्णायक भूमिका मांडली. गेल्या दोन वर्षापासून डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीचे दोन मार्ग सुरू झाले होते. त्यासाठी प्रशासनाने परवाने दिले असल्याचा आरोपही करण्यात आला.
काही मंडळांच्या मनमानी पणामुळे अनेक मंडळांना आपली मिरवणूक पुढे जाता येत नसल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे मंगळवारी मिरवणूक काढण्याचा प्राथमिक निर्णय घ्यावा लागला होता. काही मंडळांच्या मी पणामुळे इतर मंडळांच्या मिरवणुका पुढे जाण्यात अडथळा निर्माण होत होता. एकाच ठिकाणी काही मंडळे तळ ठोकून थांबत होती. यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या सह विविध बाबी आणि अडचणी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास समितीने आणून दिल्या. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. एकाच ठिकाणी अधिक वेळ थांबणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
आता एक मार्ग एक परवाना तोही पारंपारिक मार्ग राहणार आहे. प्रत्येक मंडळास पंधरा मिनिटाची समान संधी प्रत्येक चौकात देण्यात येणार आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ही मिरवणूक सुरू करण्यात येणार आहे. मंत्री अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफाही मिरवणूक मार्गात आणला जाणार नाही. अभिवादनासाठी संबंधित मान्यवर पायी चालत येतील यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. शहरात मरीआई चौक, श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे आणि डफरीन चौक मार्गे येणाऱ्या प्रत्येकी एक एक मंडळास डॉ. आंबेडकर चौकातून पुढे जाता येईल असे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे.
या पत्रकार परिषदेस विश्वस्त सुबोध वाघमोडे, ॲड. संजीव सदाफुले, प्रवीण निकाळजे, के.डी. कांबळे, राजा कदम, शशिकांत कांबळे, अरुण भालेराव, उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. लौकिक इंगळे, ॲड. विनीत गायकवाड, योगेश कांबळे, अजित गायकवाड, सुग्रीव जेटीथोर, शिवम सोनकांबळे, पृथ्वीजित सरवदे, प्रबुद्धकुमार दोड्यानूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे पूजन या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले.
एकूण 485 मंडळांपैकी 210 मंडळ काढणार मिरवणूक
भीम जयंती उत्सवामध्ये एकूण 485 मंडळे आहेत. त्यापैकी 210 मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येते. पूर्वी बैलगाड्यांमधून मिरवणूक काढण्यात येत होती. आता तो प्रवास कंटेनर पर्यंत पोहोचला आहे. 13 एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजता विविध मंडळाकडून प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर रविवार दि. 19 एप्रिल रोजी भव्य अशी मिरवणूक पारंपरिक मार्गावरून शहरात काढण्यात येणार आहे. सर्व मंडळांनी वेळेत आपल्या मिरवणुका सुरू कराव्यात, असे आवाहन विश्वस्त राजाभाऊ सरवदे , राजाभाऊ इंगळे, सुबोध वाघमोडे यांनी केले आहे.
मिरवणुकीचा पारंपारिक मार्ग राहणार असा –
पार्क स्टेडियम जवळील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुध्दवंदना घेऊन भव्य मिरवणुकीस रविवारी सकाळी 11.30 वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. ही मिरवणूक डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पीटल, चांदणी चौक, महापौर निवास, स्टेशन चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, सुपर मार्केट, मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, सोन्या मारुती चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ, चाटी गल्ली, बाळीवेस, तरटी नाका पोलिस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमीसमोर पंचाची चावडी येथे मिरवणूकीची सांगता होईल.

















