वेळापूर – “आई-वडिलांचे छत्र नसताना मामाने केलेल्या कष्टाची आणि संघर्षाची जाणीव ठेवून जेव्हा मुले यशाचे शिखर गाठतात, तेव्हा तो क्षण केवळ कुटुंबाचा नसून संपूर्ण गावाला अभिमान वाटण्याजोगा असतो. कोळेगाव हे एक शांत आणि प्रयोगशील गाव आहे. इथल्या तरुणांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर केवळ गावाचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचा नावलौकिक वाढवावा,” असे प्रतिपादन माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केले.
कोळेगाव (ता. माळशिरस) येथे गावातील यशस्वी तरुणांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेले विश्वास चळेकर, केंद्रप्रमुख परीक्षेत यश संजय बेंदगुडे आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीपदी निवड झालेले योगेश सावंत यांचा आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. रवींद्र बेंदगुडे,बाजार समितीचे संचालक नितीन सावंत,डॉ हनुमंत मोरे,ॲड. धनंजय दुपडे, अरुण सावंत, बाबासाहेब धोत्रे, अधिकराव सावंत, कैलास दुपडे, संभाजी दुपडे, नागेश दुपडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
संघर्षातूनच यशाची वाट – आ. जानकर
आपल्या भाषणात आमदार जानकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “२५ वर्षांपूर्वी मी कोणत्याही राजकीय पदावर नव्हतो. मात्र, लोकांच्या कल्याणाची जिद्द माझ्या मनात होती. त्याकाळी कोळेगावची शेती पाण्याअभावी करपून जात होती. तेव्हा आम्ही कालव्यासाठी संघर्ष केला आणि लोकांना हक्काचे पाणी मिळवून दिले. त्या लढाईनेच मला संघर्षाची खरी ताकद दिली.”
याप्रसंगी त्यांनी तरुणांना केवळ शेतीवर अवलंबून न राहता रोजगाराचे विविध पर्याय शोधण्याचे आवाहन केले. कष्टाची जोड आणि सातत्य असेल, तर यश नक्कीच मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी पारसे यांनी केले.






















