वेळापुर – येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री क्षेत्र वेळापुर ते श्री क्षेत्र अक्कलकोट या श्री स्वामी समर्थ पादुका सोहळ्याचे शनिवारी श्री क्षेत्र अक्कलकोट कडे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.
अक्कलकोट निवांसी श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही १४८ वी पुण्यतिथी आहे. वेळापुर ते अक्कलकोट या पादुका सोहळ्याचे हे १७ वर्ष आहे. प्रस्थान पुजा श्री नवनाथ बनकर व सौं प्रीती बनकर या उभयताच्या हस्ते करण्यात आली. या पूजेचे पौरोहित्य महेश स्वामी यांनी केले.
वेळापुर येथील ग्रामदैवत श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरात पादुकांची रवी गुरव यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली व सोहळा बोडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव मार्गे श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी पोहोचला. बुधवार दि. १५ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे.























