पंढरपूर – महाराष्ट्राची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर शहरात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी येतो, मात्र शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था, वाढते खड्डे आणि अपूर्ण कामे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटात भालके, सावंत यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवकांचा जाहीर पक्षप्रवेश टिळक स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आक्रमक भूमिका घेत चक्क रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालून आणि फुले उधळून ‘रस्त्याची महापूजा’ करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या प्रतीकात्मक आंदोलनातून त्यांनी पालिका प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या कारभारावर जोरदार टीका केली.
“शहरात येणारा निधी नेमका कुठे जातो? नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत, शिरसट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातच या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा इशारा दिला. तसेच, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात थेट तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलना वेळी माजी नगरसेवक विक्रम शिरसट. दिपक येळे, अफजल सय्यद, यालप्पा कबाडे, तेजस कोरके , यश चंदनसेवे, दर्शन ताठे, बंटी खंडागले यांच्यासह अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूरसारख्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आणि रस्त्यांची दुरवस्था ही गंभीर बाब असून, आता उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.























