बार्शी – श्री भगवंत प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला भाविकांसाठी एक विशेष आध्यात्मिक कार्यक्रम श्री भगवंत मंदिर समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री भगवंत भक्त विजय थोरात (कोरे) यांच्या नव्या भगवंत भजनाचे भव्य अनावरण करण्यात येणार आहे.
हा भजन अनावरण सोहळा दि. २७ एप्रिल रोजी श्री भगवंत मंदिर, बार्शी येथे श्री भगवंत प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला महाराजांचे प्रवचन संपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात गुरुवर्य ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज व मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते प्रोजेक्टरच्या माध्यमातून विजय थोरात यांच्या नव्या रचनेचे अनावरण करण्यात येणार आहे. या भजनाचे शीर्षक “माझ्या हृदयात वसतो भगवंत” व “माझ्या प्रत्येक श्वासात भगवंत” असे असून, भक्तीभावाने परिपूर्ण ही रचना भाविकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
हा कार्यक्रम बार्शीच्या नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, अमृत राऊत, सचिन वायकुळे, डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशन, तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सोलापूर यांचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या या कार्यक्रमामुळे श्री भगवंत प्रगट दिनाच्या उत्सवाला विशेष आध्यात्मिक रंग येणार आहे.
























