माढा : विठ्ठल प्रतिष्ठान निमगाव (टें) संचलित आर्या पब्लिक स्कूल, माढा येथे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन रणजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.विकास मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आर्या पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथील प्राचार्य लोखंडे, आर्या जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मारकड, आर्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन उबाळे, विठ्ठल प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सागर जाडकर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक खापरे, संत गाडगेबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक कापसे , आर्या पब्लिक स्कूलचे प्राचार्य एस. जे. थोरात, संभाजी पाटील तसेच विज्ञान विभाग प्रमुख जयदेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून १०० हून अधिक विविध वैज्ञानिक प्रायोगिक मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेल्समधून त्यांची कल्पकता, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्टपणे दिसून आला.
माढा व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड निर्माण होऊन त्यांच्या कौशल्य विकासाला नक्कीच चालना मिळेल,मान्यवरांनी असा विश्वास यावेळी व्यक्त केला.


















