जेऊर – कोंढेज (ता.करमाळा) येथील मुळ रहिवासी व सध्या नागपूर शहर पोलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी एव्हरेस्ट, किब आणि अन्य शिखरांचा परिघ देत जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे धौलागिरी शिखर यशस्वीरित्या सर करून इतिहास घडविला आहे.
श्री ननवरे यांनी सर्वसामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन पोलीस दलात स्थान मिळवले त्यांना गिर्यारोहणाचा छंद असून आजपर्यंत अनेक अतिउच्च शिखरे त्यांनी सर केलेली आहेत .८ हजार १६७ मीटर उंचीचे धौलागिरी शिखर हे गिर्यारोहण क्षेत्रात अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. तीव्र थंडी, कमी ऑक्सिजन, बर्फाचे वादळ, खडतर चढाई व उतार आणि जीवघेण्या हिमफटी (क्रेव्हासेस) मुळे ही मोहीम अत्यंत धोकादायक ठरते. अशा कठीण परिस्थितीतही श्री. ननवरे यांनी अपार धैर्य, चिकाटी आणि नियोजनाच्या जोरावर हे शिखर सर केले. महाराष्ट्र पोलिस दलातून धौलागिरी शिखर सर करणारे श्री. ननवरे हे पहिले अधिकारी ठरले आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे करमाळा तालुक्याच्या व संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्री. ननवरे यांनी यापूर्वीही जगातील अत्युच्च आणि आव्हानात्मक शिखरांवर यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत. यात माउंट एव्हरेस्ट (८,८४८ मीटर) उंच, जगातील सर्वात माउंट ल्होत्से (८,५१६ मीटर), जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर माउंट मकालू (८,४८५ मीटर), पाचव्या क्रमांकाचे उंच माउंट मनास्लू (८,१६३ मीटर) या शिखरांचा समावेश आहे. या साहसी कामगिरीबद्दल पोलिस दलासह करमाळा तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.



















