सोलापूर – ह.भ.प. बळीराम श्रीपती जांभळे महाराज हे माझे वडील. त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने त्यांनी केलेले कौटुंबिक, सामाजिक आणि सांप्रदायिक कार्य आठवले की मन अभिमानाने भरून येते. समाजसेवा, वारकरी परंपरेची जपणूक आणि कुटुंबप्रेम यांचा सुंदर संगम त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळतो. त्यांनी केलेले कार्य आजही समाजासाठी आदर्श ठरावे असेच आहे.
आज वयाची ५४ वर्षे पूर्ण करत असतानाही त्यांच्या अंगात सोळा वर्षांच्या तरुणालाही लाजवेल अशी चपळाई आणि उत्साह आहे. त्यांचा जन्म दिनांक २५ एप्रिल १९७२ रोजी सोलापूर येथे झाला. श्रीपती जांभळे (वडील) आणि राजूबाई जांभळे (आई) यांच्या पोटी जन्मलेले ते सहावे अपत्य.
लहानपणीच वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या कठीण काळात ह.भ.प. चंद्रकांत काका यांनी त्यांना आधार देत प्रेमाने वाढवले. आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मात्र शिक्षण थांबले तरी कर्तृत्व थांबले नाही.
क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गोजूकाई जपानीज कराटे संस्थेचे ब्लॅक बेल्ट मिळवून ते कराटे प्रशिक्षक म्हणून तब्बल वीस वर्षे कार्यरत होते. त्यापैकी पाच वर्षे त्यांनी पोलीस मुख्यालयात पोलीस बॉय साठी मोफत कराटे प्रशिक्षण दिले. त्या प्रशिक्षणातून घडलेली अनेक मुले-मुली आज पोलीस सेवेत कार्यरत आहेत.
याशिवाय होडगी स्टेशन, कुचन प्रशाला, नु. म. वि. प्रशाला, संभाजी प्रशाला, परंडा (ता. बार्शी) तसेच मार्डी नागनाथ मंदिर परिसर (ता. उत्तर सोलापूर) येथे जाऊन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले.
सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळे त्यांनी निराळे वस्ती येथील हिंदू रक्षक मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतला. पारंपरिक उत्सवांमध्ये लेझीम या खेळाला नवे बळ देत त्यांनी राघवेंद्र नगर गणेश उत्सव लेझीम संघ उभा केला. त्यानंतर अनेक युवकांना लेझीमचे प्रशिक्षण देऊन तयार केले.
नगरसेवक चेतन नरोटे यांच्या नवरात्र उत्सव मंडळातील युवकांनाही त्यांनी लेझीमचे प्रशिक्षण दिले. तसेच पूर्व भागात प्रसिद्ध असलेल्या वीर गणपती गणेश उत्सव मंडळातील खेळाडूंनाही प्रशिक्षण देऊन एक सक्षम लेझीम संघ तयार केला.
निराळे वस्ती येथील श्री दत्त गणेश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सांप्रदायिक सप्ताहाचे नियोजनही त्यांनी केले. त्याचबरोबर समाजातील लोकांच्या आरोग्यासाठी विविध आरोग्य शिबिरेही आयोजित केली.
घरात वारकरी परंपरा असल्याने त्यांनी सांप्रदायिक कार्यातही मोठे योगदान दिले. त्यांचे परममित्र व माझे गुरुवर्य ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या सहकार्याने त्यांनी सोलापूर शहरातील माघवारीला जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र आणून माघवारी पालखी सोहळ्याची सुरुवात केली.
यात त्यांनी आषाढी वारीप्रमाणे अश्वाचा गोल रिंगण सोहळा सुरू करून या सोहळ्याला नवे वैभव प्राप्त करून दिले. रिंगण आखण्यापासून ते अश्वाच्या गोल रिंगणाच्या पूर्णतेपर्यंतची सर्व सेवा ते वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह पार पाडतात. सोलापूरच्या वारकरी परंपरेत त्यांनी हा एक मानाचा तुरा खोवला आहे.
इतके सर्व करत असतानाही त्यांनी कुटुंबाची जबाबदारी कधीही ढळू दिली नाही. आजोबांच्या निधनानंतर आजीने चाळीस वर्षे संसाराचा गाडा ओढला आणि आजीच्या पश्चात आज २१ व्यक्तींचे एकत्रित कुटुंब ज्या छत्राखाली सुरक्षित आहे, ते म्हणजे सर्वांचे लाडके “नाना” – बळीराम जांभळे महाराज.
गेल्या चार वर्षांपासून त्यांनी वारकरी संप्रदायात एक नवे कार्य सुरू केले आहे. हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील एक महिला वारकरी संप्रदायाशी जोडावी, हा त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी ते विविध भागात जाऊन महिलांना टाळ वाजवणे, हरिपाठ म्हणणे याचे मोफत प्रशिक्षण देत आहेत.
त्यांच्या या उपक्रमामुळे आज सोलापूर शहरात सुमारे १० ते १२ शाखा कार्यरत आहेत. जवळपास २०० ते ३०० महिला आणि ५० पेक्षा अधिक मुले-मुली या कार्याशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर सांप्रदायिक व ग्रंथसेवा घडावी म्हणून ते प्रवचन आणि कीर्तनही सादर करत आहेत.
त्यांच्या प्रेरणेतून आणि ज्योतीराम चांगभले गुरुजी यांच्या सहकार्याने मीही पखवाज प्रशिक्षण वर्ग सुरू केला आणि श्री संत सावता महाराज मृदंग वादन प्रशिक्षण संस्था स्थापन केली. या माध्यमातून नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना संस्कार आणि संगीताची दिशा देण्याचे कार्य सुरू आहे.
असा आदर्श पिता मला लाभला, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील चरण आठवतात—
“माझ्या वडिलांची मिरासी गा देवा,
तुझी चरण सेवा पांडुरंगा…”
ज्ञानदान असो, अन्नदान असो किंवा समाजसेवा — माझ्या वडिलांच्या हातून जशी ही सेवा घडली, तशीच सेवा माझ्या हातूनही घडू दे, अशी प्रार्थना त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी पांडुरंगाच्या चरणी करीत आहे.
– आपला दासानुदास
ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

















