सोलापुर – वसंत विहार रोड परिसरातील स्पर्श हॉस्पिटल येथे रुग्ण नातेवाईकास भेटायला गेलेल्या WCAS सदस्या गौरी वेर्णेकर यांना एक भारद्वाज पक्षी हॉस्पिटलच्या चवथ्या मजल्यावरील खिडकीच्या तावदानामध्ये विचित्ररित्या अडकल्याचे व तेथून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब WCAS चे अजित चौहान यांना या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून या घटनेबद्दल माहिती दिली. त्यांच्या अथक प्रयत्नाने खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका त्यांनी केली.
दरम्यान अजित चौहान यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली असता त्यांना तिथे भारद्वाज हा पक्षी विचित्र पद्धतीने खिडक्यांच्या तावदानात अडकल्याचे दिसून आले. एक मोठ्या लांबीचा बांबू मागवला व तिसऱ्या मजल्यावर जाऊन तिथून त्या पक्ष्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता अथक परिश्रमानंतर तो पक्षी उडून दुसऱ्या मजल्यावरील तावदानात आला पुन्हा तिथून बांबूने हुसकावून लावले असता तो दुसऱ्या मजल्यावर येऊन खाली बसला आणि सर्वांनी सुटकेचा निस्वास घेतला. त्या पक्ष्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून त्याला थोडेसे पाणी पाजून हॉस्पिटलमागेच लगेच निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले असता त्याने आकाशात भरारी घेतली. या बचाव कार्यात सिद्धांत चौहान व हॉस्पिटलचे कर्मचारी सोहेल पटेल यांनी सहभाग घेतला.
भारद्वाज (Greater Coucal) हा पक्षी कोकिळ कुळातील एक आकाराने मोठा, काळ्या-तांबड्या रंगाचा पक्षी आहे. महाराष्ट्रात याला ‘देवकावळा’ किंवा ‘सोनकावळा’ म्हणूनही ओळखतात. हा पक्षी प्रामुख्याने झुडपी जंगले, बागा आणि मानवी वस्तीजवळ जमिनीवर राहतो आणि किडे, पाली, उंदीर खाऊन शेतीचे रक्षण करतो.






















