बार्शी – भारताच्या १६ व्या राष्ट्रीय जनगणनेस महाराष्ट्र दिनी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. बार्शी शहरातून देखील आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी या जनगणनेत सहभाग घेत शुक्रवारी स्वगणना केली. यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, निवासी नायब तहसीलदार सुभाष बदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप उपस्थित होते.
तहसील कार्यालयात आमदार दिलीप सोपल यांना स्वगणना करण्यासाठी तहसीलदार शेख, मुख्याधिकारी मुलाणी, कर अधिकारी विठ्ठल पाटोळे यांनी मार्गदर्शन केले. भारताच्या आजपासून सुरु झालेल्या १६ व्या जनगणनेसाठी शहर व तालुक्यातील सर्वच नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी आमदार सोपल यांनी केले.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील या जनगणनेत स्वगणना करत सहभाग नोंदवला. तसेच तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी देखील स्वग्रणाकरत या जनगणनेत सहभाग नोंदवला. सर्व तालुक्यातील प्रत्येक समाजातील आणि प्रत्येक घटकातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
फोटो ओळी
भारताच्या राष्ट्रीय जनगणनेबाबत आमदार सोपल यांना माहिती देताना तहसीलदार शेख.


























