सोलापूर : शहरातील फॉरेस्ट आणि राजेंद्र चौक परिसरात महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज कारवाई केली. यामध्ये बेवारस दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या तर चार चाकी तीन हात गाड्या जागेवरच निष्काशीत केल्या. बेवारस रिक्षा जप्त करण्याची कारवाई महापालिकेकडून पहिल्यांदाच केली आहे.
सोलापूर शहरात रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने नियमितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील बेवारस वाहनेही जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. आज महापालिकेच्या पथकाने फॉरेस्ट येथील मच्छी मार्केट जवळील बेवारस एक रिक्षा जप्त केली. तेथील चार चाकी तीन हात गाड्या जागेवर निष्कासित केल्या. खोके जागेवर निष्कासित केले. त्यानंतर राजेंद्र चौकातील बेवारस एक रिक्षा जप्त केली. बेवारस रिक्षा जप्त करण्याची कारवाई महापालिकेकडून पहिल्यांदाच होत आहे.
पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. शहरात अतिक्रमण आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे.


























